मुंबई,दि.13:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाचीही खिल्ली उडवली. यावेळी त्यांनी आयकर, ईडीच्या कारवायांवर भाष्य केलं. लखीमपूरची हिंसा, मावळचा गोळीबार आणि महाराष्ट्र बंद यावरही भूमिका स्पष्ट केली. मात्र, या गंभीर पत्रकार परिषदेतील सुरुवात त्यांनी काहीशी हटके केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा किस्साच पवारांनी सांगितला. जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. दोघांचं जुळलं. पण आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असं शरद पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली.
यावेळी पवारांनी आयकराच्या धाडीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहुणे हा शब्द वापरला हे चांगलं केलं. हा शब्द मी कॉईन केला होता. मी बोलेल पण त्यांची चौकशी झाल्यावर बोलेल. वस्तुस्थिती सांगेल. ती चौकशी सुरू आहे. केंद्रातील काही अधिकाऱ्यांकडून काही माहिती घेतली. पाहुणे येतात. अनेक ठिकाणी येतात. एक दिवस असतात, दोन दिवस असतात, तीन दिवस असतात, आजचा सहावा दिवस आहे. पाहुणाचार घ्यावा, पण अजीर्ण होईल इतका पाहुणाचार असू नये, असं पवार म्हणाले.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वात आधी जयंत पाटील यांच्या मुलाची बातमी दिली. आमचे सर्व सहकारी आहेत. त्यातील एकाला आनंदाची बातमी द्यायाची आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टीकोण किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांचे चिरंजीवांनी काल संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोझ केला. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवास इस्लापूरपर्यंत सीमित नाही आहोत. आम्ही एकदम पॅरिस वगैरे जातो. ठिकाणं इंटरनॅशनल असेल. पण दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल, असं सांगतानाच आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असं पवार म्हणाले. पवारांच्या या विधानानंतर एकच खसखस पिकली.