Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच घेणार मोठा निर्णय

0

दि.22: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांना विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याच्या चर्चेदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर नितीश कुमार भाजप आघाडीपासून म्हणजेच एनडीएपासून वेगळे होण्याचा विचार करत आहेत. याबाबत नितीशकुमार हे लवकरच निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी अलिकडेच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) आणि नितीश कुमार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांची भेट

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्यात प्रशांत किशोर यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रशांत किशोर यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी नवी दिल्लीत नितीश कुमार यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीबाबत नितीश कुमार यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी हसत सांगितले की, प्रशांत किशोर यांच्याशी त्यांचे जुने नाते आहे.

भाजपा आणि नितीश कुमार यांच्यात वाद

बिहारमध्ये नितीश यांचा पक्ष जेडीयू आणि भाजपचे युतीचे सरकार आहे. मात्र जातनिहाय जनगणनेवरून जेडीयू आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. या मुद्द्यावर आरजेडी नितीश यांच्यासोबत आहे. भाजपच्या विरोधात तगडा उमेदवार द्यावा अशी विरोधकांची रणनीती आहे. यामुळे काँग्रेसलाही पाठिंबा द्यावा लागेल, असा त्यामागचा विचार आहे.

नितीशकुमार यांच्या नावावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आता भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) ऐक्याला विरोधी पक्षांनी सुरुंग लावला आहे का? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांचा प्रचार यशस्वी होणार का? आणि 10 मार्चला 5 येणाऱ्या राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकाल कोणाचे भवितव्य ठरवणार? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here