मुंबई,दि.2: भारत जोडो यात्रेत माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना धक्काबुक्की झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. मागच्या 56 दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमीत्ताने भारत भ्रमंती दौरा करत आहेत. दरम्यान मागच्या आठवड्यापासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणात आली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडी यात्रा आज सकाळी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून पुन्हा सुरू झाली. या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही या यात्रेत सामील होत आहेत. दरम्यान गर्दीत धक्काबुक्की झाल्याने महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री नितीन राऊत यांना गंभीर दुखापत झाली आहे.
महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भारत जोडो यात्रेदरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे ते खाली पडले. दरम्यान त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच हाताला आणि पायालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 11 दिवस चालणार आहे. 7 नोव्हेंबरला ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोहोचणार आहे. देगलूरमध्ये ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार असून, यात्रेच्या सत्कारासाठी देगलूर नगरपरिषदेकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. यात्रेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत समाजसेविका मेधा पाटकरही सहभागी होणार आहेत. या यात्रेत वकील, डॉक्टर, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल गांधी नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी रोज सभा व कॉर्नर सभा होणार आहेत. 10 नोव्हेंबरला नांदेड राहुल गांधी मोठ्या नेत्यांसह सर्वांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर नांदेड शहरातील देगलूर नाका येथून पदयात्रेला सुरुवात होईल, त्याच दिवशी नवीन मोंढा मैदानावर सभा देखील होणार आहे. यानंतर ते अकोला जिल्ह्यात पोहोचणार आहे. दररोज 24 ते 25 किलोमीटरची पदयात्रा होणार असून, यात्रेत महाराष्ट्रासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.