नवी दिल्ली,दि.8: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांबाबत गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींसाठी ‘कॅशलेस ट्रीटमेंट’ योजना जाहीर केली आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मार्च महिन्यापासून देशभरात कॅशलेस उपचार मिळणार आहेत.
अपघात झाल्यापासून सात दिवसांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून जखमींचा एकूण 1.5 लाखांपर्यंतचा खर्च केला जाईल. सध्या या योजनेवर काम केलं जात असून, मार्चपर्यंत ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर वाहनांमुळे अपघात झाल्यास जखमींना प्रति व्यक्तीला दीड लाख रुपयांपर्यंतचा उपचार कॅशलेस करता येणार आहे. योजना कोणत्याही श्रेणीतील रस्त्यावर मोटार वाहनांच्या वापरामुळे होणाऱ्या सर्व अपघातांना लागू होईल. तसंच जर अपघातानंतर 24 तासांत पोलिसांना माहिती देण्यात आली तरच सरकार उपचाराचा खर्च उचलेल. तसंच हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल असंही सांगण्यात आलं आहे.