नागपूर,दि.२१: Nitin Gadkari On Brahmin | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही. मराठा महाराष्ट्रात शक्तिशाली आहेत. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व आहे. तेथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा हे सर्वच क्षेत्रांत शक्तिशाली आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व सध्या देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसेच गडकरी स्वतःही केंद्रीय मंत्री आहेत.
मी ब्राह्मण जातीचा आहे… | Nitin Gadkari On Brahmin
मी ब्राह्मण जातीचा आहे. परमेश्वराचे माझ्यावर एक उपकार आहेत. आम्हाला आरक्षण नाही, असेही गडकरी म्हणाले. आपण जात, धर्म व पंथ मानत नसल्याचे अनेकवेळा नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पण त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात स्वतःच्या जातीला महाराष्ट्रात फारसे महत्त्व नसल्याची खंत व्यक्त केली.

नागपुरातील हलबा महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मी जातपात मानत नाही. माणूस हा जातीपातीने नव्हे, तर कर्तृत्वाने मोठा होतो. त्या जोरावरच माणूस ओळखला जायला हवा. हलबा समाजातील मुलांनाही चांगले शिक्षण घेऊन आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगती करावी. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठत लोक काम करत असल्याचेही गडकरी म्हणाले.
मी एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेलो. तिथे सर्वजण माझ्याकडे आले. म्हणाले, पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आपल्या समाजाचा कुणी दमदार नेता असेल तर ते तुम्ही आहात. मी म्हणालो, मीच का? ते म्हणाले कारण तुम्ही ब्राह्मण आहे. मी म्हणालो, मी जात-पात मानत नाही. तुम्ही मला हे का सांगत आहात? असे गडकरी म्हणाले.








