नागपूर,दि.15: भाजपा नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मोठी अॅाफर मिळाली होती. स्वतः गडकरी यांनी याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाल्यास एका राजकारण्याने आपल्याला पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मोठे विधान केले, परंतु आपली अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसल्याचे सांगत आपण ही ऑफर नाकारली. असे गडकरी म्हणाले.
नागपुरातील एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले, ‘मला एक प्रसंग आठवला… मी कोणाचेही नाव घेणार नाही. ‘तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ’, असे त्या व्यक्तीने म्हटले होते. मात्र, हे संभाषण कधी झाले हे त्यांनी सांगितले नाही.
जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, परंतु बहुमताच्या तुलनेत तो कमी पडला आणि मित्रपक्षांच्या बळावर NDA सरकार स्थापन झाले. आता निवडणुकीला 4 महिन्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
पंतप्रधान होणे हे माझे ध्येय नाही: नितीन गडकरी
नागपुरात पत्रकारांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेले नितीन गडकरी म्हणाले, ‘मला कोणीतरी सांगितले की तुम्ही पंतप्रधान झालात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, मी म्हणालो तुम्ही मला पाठिंबा का द्याल आणि मी तुमचा पाठिंबा का घेऊ? पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझ्या मूल्यांशी आणि माझ्या संस्थेशी एकनिष्ठ आहे.. मी कोणत्याही पदासाठी तडजोड करत नाही. हे मूल्य भारतीय लोकशाहीचा पाया आहे.
2024 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींचे नाव पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात गडकरींना पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्यानंतर तिसरे सर्वात योग्य नेते म्हणून स्थान देण्यात आले होते.