nitesh rane: नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे यांचे मोठं विधान

0

मुंबई,दि.१३: nitesh rane: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्याने भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापलेलं आहे. भाजपाकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर महाविकास आघाडी मलिक राजीनामा देणार नसल्याचं सांगत आहे. याच दरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचं खळबळजनक विधान केलं तसेच त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील अशा प्रकारची विधानं केली गेल्यामुळ मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “मी केलेल्या वक्तव्यावरून माझ्या विरोधात आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर महाविकासआघाडी आणि पवार यांचे दाऊद इब्राहिमवर इतकच प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या केबिनमधून गांधीजींचा फोटो काढून दाऊदचा फोटो लावावा. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पर्दाफाश केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.” असं विधान भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here