मुंबई,दि.११: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरी ड्रग्ज सापडल्याचं जाहीर वक्तव्य पत्रकार परिषदेत केल्याप्रकरणी मलिक यांची मुलगी निलोफर मलिक (खान) यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘फडणवीस यांच्यामुळं माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असून त्याची भरपाई म्हणून त्यांनी ४ कोटी रुपये द्यावेत व माफी मागावी. अन्यथा कोर्टात जावं लागेल,’ असा इशारा निलोफर मलिक यांनी फडणवीसांना दिला आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीस यांनी १ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी मलिक यांच्या जावयाबद्दल काही वक्तव्ये केली होती. ‘नवाब मलिक यांचे जावई हे ड्रग्जसकट सापडले आहेत. ज्यांच्या घरीच ड्रग्ज सापडतं त्यांच्या पक्षाला ड्रग्ज व्यापाराचा सूत्रधार म्हणायचं का?,’ अशी विचारणा फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या याच वक्तव्याला निलोफर मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. फडणवीस यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि खोडसाळ आहेत. खुद्द एनसीबीच्या आरोपपत्रातही समीर खान यांच्यावर असा कुठला आरोप नाही.
समीर खान यांच्या घरात कुठलीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नसल्याचं १४ जानेवारी २०२१ च्या पंचनाम्यात नमूद आहे. असं असताना फडणवीस यांनी आरोप केले. त्यांच्या आरोपांमुळं आम्हाला प्रचंड मानसिक त्रासातून जावं लागत आहे. संपूर्ण कुटुंबाची बदनामी झाली आहे. प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्याची भरपाई म्हणून १५ दिवसांच्या आता पाच कोटी रुपये द्यावेत व लेखी माफी मागावी,’ अशी मागणी निलोफर यांनी नोटिशीच्या माध्यमातून केली आहे. अन्यथा, न्यायालयात जावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निलोफर मलिक यांनी ही नोटीस ट्विटरवर शेअर केली आहे. ‘खोट्या आरोपांमुळं आयुष्य उद्ध्वस्त होते. एखाद्यावर आरोप करताना आपण काय बोलतो आहोत याचा विचार करायला हवा. फडणवीसांना पाठवलेली ही नोटीस त्याचीच जाणीव करून देण्यासाठी आहे. आता आम्ही मागे हटणार नाही,’ असंही निलोफर यांनी म्हटलं आहे.