मुंबई,दि.९: NIAनी महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) सतत सतर्क असते. आज सकाळी (दि. ९ डिसेंबर) महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटमध्ये १, तर महाराष्ट्रात ४३ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदरमधील एका ठिकाणाचा समावेश आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि एनआयए यांनी संयुक्तपणे केलेली कारवाई अतिशय मोठी असून या कारवाईतील आणखी माहिती थोड्या वेळातच समोर येण्याची शक्यता आहे.
या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणे इसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला मोहम्मद शाहनवाज आलम दहशतवाद्याला एनआयएने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ठाण्यातील पडघा गावात सर्वात मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण कारवाईत सध्या १५ जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच कारवाई करण्यात आली होती. महाराष्ट्रात सतत अशाप्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. तरुणांना दहशतवाद्यांच्या कट्टर विचारसरणीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.