सोलापूर,दि.२०: सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली | केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठी घोषणा केली आहे यामुळे सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे. सोलापूरकर अनेक वर्षापासून विमानसेवा सुरु करावी अशी मागणी करत होते. सोलापूर-मुंबई तसेच सोलापूर-बेंगळुरू विमानसेवा सुरू करावी अशी मागणी सोलापूरकर करत होते. नुकतेच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर सोलापूर-तिरुपती, मुंबई विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती.
सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली
सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. तर बुकिंग २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे, अशी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध असणाऱ्या या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद ! मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरु करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. ज्याला आता यश आले आहे. मुंबई आणि बेंगळुरू या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.
‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बेंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास आहे’
स्टार एअर उड्डाण वेळापत्रक:
• सोलापूर-मुंबई
प्रस्थान : दु. १२ः५५ वा.
• मुंबई-सोलापूर
प्रस्थान : दुपारी २:४५ वा.
• बंगळुरू-सोलापूर
प्रस्थान : सकाळी ११ः१० वा.
• सोलापूर-बंगळुरू
प्रस्थान : दुपारी ४:१५ वा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण
मुंबई-सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबई येथून होणार आहे.








