आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता : मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

0

मुंबई,दि.६: क्रूझ ड्रग पार्टीवर एनसीबीचे समीर वानखेडे यांनी कारवाई करत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक केली होती. आर्यन खानवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज (भारतीय) (Mohit Kamboj) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी (drug party) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) मोठा आरोप केला. कार्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह (Aryan Khan) इतरांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील (Sunil Patil) या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे आणि सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे.

इतकेच नाही, तर तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख (Hrishikesh Deshmukh) यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे, असा खळबळजनक आरोप कंबोज यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावाही कंबोज यांनी केला आहे.

कंबोज यांनी मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत हे खळबळजनक आरोप केले. सुनील पाटील बाबत माहिती देताना कंबोज म्हणाले की, सुनील पाटील याने १ ऑक्टोबर या दिवशी सॅम डिसूझाला फोन केला होता. मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे ही माहिती त्याने डिसूझाला दिली. शिवाय या पार्टीत सहभागी होणाऱ्या २७ लोकांची माहिती माझ्याकडे आहे, अशी माहितीही त्याने डिसूझाला दिली. या बाबत मी मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्याशी बोलणार आहे असेही तो डिसूझाला म्हणाला. यानंतर आपण एनसीबीचे एक अधिकारी व्ही. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क करून देऊ असे डिसूझा याने सुनील पाटीलला सांगितले.

के.पी. गोसावी याच्याकडे कार्डिलिया क्रुझ पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती असल्याचे सुनील पाटील यानेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचेही कंबोज यांनी म्हटले आहे. याच सुनील पाटीलने सॅम डिसूझाला के. पी. गोसावी याचा मोबाईल नंबर दिला. इतकेच नाही तर, हा किरण गोसावीच सर्व कारवाई करणार आहे, अशी माहितीही डिसूझा याला दिली. हे लक्षात घेता हा संपूर्ण कट सुनील पाटील यानेच रचला होता, असा गंभीर आरोप कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून तो महाविकास आघाडीच्या कोणत्या मंत्र्याच्या इशाऱ्यावर हे काम करत होता, असा सवालही कंबोज यांनी विचारला आहे.

सुनील पाटील याच्याबाबत अधिक माहिती देताना कंबोज यांनी सांगितले की, पाटील याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. या बरोबरच सुनील पाटील हा बदल्यांचे रॅकेट देखील चालवत होता असा गंभीर दावाही कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हा पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. तो संपूर्ण राज्यात रॅकेट चालवत होता. मात्र सरकार बदलले आणि तो भूमिगत झाला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सुनील पाटील पुन्हा सक्रिय झाला अशी खळबळजनक माहिती देतानाच सुनील पाटील याच्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या चालत असत असा दावाही कंबोज यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here