परभणी,दि.२: NCP Vs Shinde Group: परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा अनेक पक्षातील नेत्यांचा सपाटा सुरू आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ जिल्हा परिषद सदस्य शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा तसेच अन्य निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारी करत असून, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षाला रामराम करणे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का | NCP Vs Shinde Group
परभणी जिल्ह्यातील १२ जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, बाजारा समितीचे संचालक, पंचायत समितीचे माजी सभापती यांच्यासह अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सगळे पदाधिकारी परभणीकडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळ पार पडणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या गळतीने राष्ट्रवादीला परभणीत मोठे खिंडार पडणार आहे.
मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इतर पक्षातून होणारे इन्कमिंग वाढल्याचे दिसत आहे.यादरम्यान आजवरचा सर्वांत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास १२ विद्यामान जिल्हा परिषद सदस्य हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. यामध्ये चार सदस्य हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार दुर्रानी यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार, गोदावरी सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी अध्यक्ष यासोबतच पंचायत समितीचे संचालक शिवसेनेत दाखल होणार आहेत.