दि.२५: ज्ञानवापी प्रकरण (Gyanvapi Masjid Case) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधानं केलं आहे. ज्ञानवापी मशिदीतील (Gyanvapi Masjid) सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद आणखी वाढला. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू बाजूने केला जात आहे, तर मुस्लिम बाजूने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे.
“वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत. मागील ३००-४०० वर्षांमध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही, असंही पवार म्हणालेत. पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधताना, “अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरुन वातावरण खराब करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं जात आहे,” असा टोला लगावलाय.
“वाराणसीमध्ये मंदिर आहे. मंदिराला कोणाचा विरोध नाहीय. मात्र मंदिराजवळ एक मशीद आहे. आज या मशिदीच्या मुद्द्यावरुन देशामध्ये सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचा कट रचला जातोय,” असंही पवार म्हणाले. “अयोध्येचा विषय संपल्यानंतर देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल असं आम्हाला वाटत होतं. मात्र भाजपाचे विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशाप्रकारची आणखी प्रकरणं समोर आणून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. अयोध्येनंतर आता वाराणसीमधून विषय समोर आणण्यामध्ये भाजपा आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित संघटना जबाबदार असून हे खेदजनक आहे,” असंही पवार म्हणालेत. “या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा देशालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. ताजमहालसारखी वस्तू आपल्या देशाची ओळख आहे,” असंही पवार म्हणाले.
“आज राजस्थानमधील कोणीतरी समोर येऊन म्हणतं की ताजमहल आमचं आहे. आमच्या पूर्वजांनी ते बांधलंय. मात्र जगाला माहितीय दिल्लीचं कुतुबमिनार कोणी बांधलंय, तेथील न्यायालय यासंदर्भात निर्णय देणार आहे. मात्र काही लोक कुतुबमिनार हिंदुंनी बनवल्याचा दावा करत आहेत. मी या गोष्टी यासाठी मंडत आहे कारण देशासमोरील आजच्या खऱ्या समस्या महागाई, बेरोजगारीसारख्या आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हावं या हेतूने सांप्रदायिक विषयांना हवा दिली जात आहे,” असंही पवार म्हणालेत.
“मोदी सरकार आणि भाजपा आज देश चालवत आहे. त्यांचा अजेंडाच हा आहे की एक विषय संपल्यावर दुसरा विषय समोर आला. काहीही करुन देशात कायम हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चनांमधील बंधुभाव संपावा आणि आपल्याला संप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू आहे,” अशी टीका पवारांनी केलीय.