Rohit Pawar: बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.२३: बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्य़े ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. शिंदे गट आणि ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा युक्तीवाद केला.

हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र लक्ष वेधून घेणारी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हापासून काही अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा हा कधीच चुकलेला नाही. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा भाग झाला होता. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करुन लक्षवेधी प्रतिक्रिया दिलीये.

रोहित पवार म्हणाले
कोर्टाने ठाकरेंना दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. परंपरा अबाधित राहिली! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन!, अशा भावना व्यक्त करत रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा सभा घेत असतानाचा फोटो शेअर करुन दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आजपर्यंत शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेची परवानगी मिळणे, हा केवळ औपचारिकतेचा भाग होता. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील एक मोठा गट फोडल्याने पहिल्यांदाच शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या पाठोपाठ शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्याने पेच निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने हरप्रकारे प्रयत्न केले होते. मुंबई महानगरपालिका दसरा मेळाव्याला परवानगी देणार नाही, हे दिसताच शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज अखेर साडे चार तासांच्या युक्तिवादानंतर शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here