राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण, आजची सुनावणी संपली

0

मुंबई,दि.20: राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण आजची सुनावणी संपली आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला निकाल दिला. शिवसेनेत बंड करून पक्षावर दावा सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांचाच पक्ष असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. ठाकरे गटाच्या व शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र केले नाही.

ठाकरे गट व शिंदे गट या निकालाच्याविरोधात न्यायालयात गेला आहे. राष्ट्रवादीतही अजित पवार यांनी बंड करत पक्षावर दावा सांगितला आहे. तर शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या आमदारांवर अपात्रेतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या सुनावण्यांची उत्सुकता लागली आहे. निकाल देण्यासाठी अवघे 10 दिवसच शिल्लक राहिलेले असताना विधानसभवनातून मोठी अपडेट येत आहे. राष्ट्रवादीची दोन्ही गटांची आजची सुनावणी संपली आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ वाढविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अध्यक्ष सुनावणीचे नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत. यासाठी ते दोन्ही गटाची परवानगी घेणार आहेत, तसा प्रस्ताव ते सर्वोच्च न्यायालयात देणार आहेत. असे झाले तर राष्ट्रवादीतील वादावर निकाल येण्यास फेब्रुवारीचा मध्यावधी उलटू शकतो.

अजित पवार गट व शरद पवार गटाला बाजू योग्य पद्धतीने मांडायची असेल तर वेळ देणे गरजेचे आहे. आजच्या सुनावणीत यासाठी वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे मत नार्वेकर यांनी मांडले आहे. सुनावणी, युक्तीवाद, प्रतिवाद यासाठी वेळ कमी देण्यात आला आहे. यावर अध्यक्ष आणि दोन्ही पवार गटांत समझोता झाला आहे. 

शिवसेना पक्षाच्या सुनावणीसाठीही वेळ वाढवून मागण्यात आला होता. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. 24 जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी, 25 जानेवारीला दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदविली जाणार आहे. 29 आणि 30 जानेवारीला दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडतील. 31 जानेवारीला सुनावणी संपविली जाईल आणि त्यापुढे निकाल देण्यासाठी शिवसेनेप्रमाणेच 10 ते 15 दिवसांचा वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here