एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे पुन्हा गंभीर आरोप

0

मुंबई,दि.१६: एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी मुंबई क्रूझ ड्रग पार्टीवर कारवाई केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. सॅम डिसूझाचा जबाब दिल्लीत नोंदवण्यात आल्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली व १८ कोटींना डील ठरले होते, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची एनसीबीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी तपास करत आहेत. हा तपास मुंबईत सुरू आहे. त्याचा संदर्भ देत नवाब मलिक यांनी या प्रकरणात नाव आलेल्या सॅम डिसूझाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सॅम डिसूझा याचा जबाब दिल्लीत नोंदवून घेण्यात आल्याचे कळते आहे. याप्रकरणातील इतरांचे जबाब मुंबईत नोंदवण्यात येत असताना सॅम डिसूझा याचाच जबाब दिल्लीत नोंदवण्याचे कारण काय?, असा सवाल मलिक यांनी केला.

सॅम हा दिल्लीत कुठे होता?, त्याने एनसीबीच्या कोणत्या अधिकाऱ्याला हवालाने पैसे पाठवले?, त्याच्यावरचा गुन्हा मागे घेण्यासाठी कोणते डील झाले?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एनसीबीला द्यावी लागतील, असेही मलिक म्हणाले. सॅम हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीतला माणूस आहे. सर्व नायजेरियन ड्रग्ज पेडलकरकडून हा हप्तेवसुलीचे काम करतो आणि तोच आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. माझी लढाई एनसीबीसोबत नाही तर खोटी प्रकरणे बनवून मुंबईत वसुलीचे रॅकेट चालवणाऱ्या समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग, आशिष रंजन आणि माने नावाचा चालक या चौघांविरुद्ध आहे, असे मलिक म्हणाले.

मलिक यांनी काशिफ खान याचे नाव घेत नवे आरोप केले. काशिफ खान हा क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा स्पॉन्सर होता. त्याच्यावर आजतगायत कारवाई का करण्यात आली नाही. त्याला अटक का करण्यात आली नाही?, असा सवाल मलिक यांनी केला. काशिफ खान हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. तो सध्या गोव्यात आहे. तिथे रशियन माफिया कार्यरत आहेत. या सर्वांकडून वसुलीचे काम काशिफ खान करतो. वानखेडे यांच्यासाठी ही वसुली केली जाते, असा दावा मलिक यांनी केला. एनसीबीच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत गोवा राज्यही येतं. असं असताना येथे धाडी पडतात आणि गोव्यात धाडी का पडत नाहीत?, असा सवाल मलिक यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here