राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपा नेत्याला लवकरच अटक होणार असल्याचा केला दावा

0

मुंबई,दि.11: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आतापर्यंत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. समीर वानखेडे (Sameer Wankhede) व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले होते. नवाब मलिक यांनी शुक्रवारी एक ट्विट करत म्हटलं होतं की ‘सरकारी पाहुणे घरी येणार’. यावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विट करत म्हटलं, जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा… जमिन घोटाळ्यात आपले नाव असेल तर आपल्या घरी सरकारी पाहुणे येणार नाही तर आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार. सोमय्यांनी केलेल्या या ट्विटनंतर नवाब मलिकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पुढील आठवड्यात एका भाजप नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा भाजप नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी तयार

नवाब मलिक म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ईडीचे अधिकारी पत्रकारांना माहिती देत आहेत की, नवाब मलिकांच्या घरी छापेमारी होणार आहे. आज किरीट सोमय्या बोलत आहेत की, पुण्यातील वक्फ बोर्डाच्या संदर्भात ईडी नवाब मलिकांच्या घरी जाणार… ईडीला घरी य़ेण्याची गरज नाही, मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी तयार आहे.

नवाब मलिक पुढे म्हणाले, ज्या प्रकारे ईडी बातम्या प्रसारित करण्याचं काम करत आहेत. पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जागेसंदर्भात आम्ही एफआयआर केली होती. तेथे ईडीचे अधिकारी गेले तपास सुरू केला आणि मीडियात बातम्या पेरल्या की वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयांवर छापेमारी केली. त्याच दिवशी आम्ही स्पष्ट केलं की, वक्फ बोर्डावर कुठल्याही प्रकारची छापेमारी झालेली नाहीये. त्यांना कुठलाही तपास करायचा असेल तर आम्ही सर्व कागदपत्रे देण्यास तयार आहोत.

माझी माहिती आहे की, दोन दिवस एका वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला बोलवण्यात आलं आणि त्याला सांगितलं तुम्ही एफआयआरचं चुकीचा केला आहे. ज्यांनी सात कोटी रुपये लुटले त्यांची शिफारस करण्याचं काम ईडीचे अधिकारी करत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले.

लवकरच एका भाजप नेत्याला अटक

सोमय्यांचं म्हणणं आहे की, पुण्यात वक्फ बोर्डाच्या जमीन व्यवहारात नवाब मलिकांनी घोटाळा केला आहे. मी सोमय्यांना सांगू इच्छितो की, वक्फ बोर्डाच्या घोटाळ्यात भाजपच्या एका नेत्या विरोधात पुढील आठवड्यात एक एफआयआर दाखल होईल आणि त्याला अटक होईल. ईडीला सांगा त्यालाही बोलवा, त्याच्याकजून अनेक गोष्टींचा उलगडा होईल असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.

किरीट सोमय्यांना ईडीचा अधिकृत प्रवक्त बनवा

नवाब मलिक म्हणाले, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, किरीट सोमय्या यांना तुम्ही ईडीचा प्रवक्ता बनवलं आहे तर अधिकृतपणे त्यांना प्रवक्ता बनवा. जर तुम्हाला काही कारवाई करायची आहे तर अधिकृतपणे त्याबाबत माहिती द्यावी. मीडियात बातम्या पेरून राज्याला बदनाम करण्याचे काम बंद करावे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here