राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ईडीच्या ‘त्या’ छापेमारीवर दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.११: महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे नोंदणी असलेल्या संस्थेशी संबंधित जमीन प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने पुण्यात सात ठिकाणी आज छापे टाकले. यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तातडीने स्पष्टीकरण दिले असून वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापा पडलेला नाही, असे नमूद केले आहे.

वक्फ बोर्ड अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. त्यामुळेच पुण्यातील ईडी छापे समोर आल्यानंतर नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा होत होती. त्याचा मलिक यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. वक्फ बोर्डावर ही कारवाई झालेली नसून वक्फ बोर्डाकडे नोंद असलेल्या एका ट्रस्टशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आलेले आहेत. वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कार्यालयावर छापे पडलेले नाहीत, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

वक्फ बोर्डाचे काम पारदर्शकपणे सुरू आहे. बोर्डातील सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आलेली आहे, असे नमूद करतानाच वक्फ बोर्डाकडे ३० हजार संस्थांची नोंद असून त्याची चौकशी करायची असल्यास ईडीने ती करावी, असेही मलिक यांनी सांगितले. ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्यापर्यंत पोहचले असे सांगितले जात आहे पण मी ईडीला घाबरत नाही. ईडीचे अधिकारी आमच्या घरी आले तर त्यांचे स्वागतच आहे, असेही मलिक म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here