राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा भाजपाच्या माजी मंत्र्यावर मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप

0

मुंबई,दि.१२: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे. आता मलिक यांनी भाजपच्या एका माजी मंत्र्यावर मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप केला आहे.

मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्याला मलिक यांनी आज उत्तर दिलं. ‘भाजपचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट आम्ही स्वत: ‘क्लीन अप’ मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सुरूच राहायला हवी असं माझं मत आहे. महाराष्ट्रात मंदिर, मशीद आणि दरग्याहच्या जमिनी ज्यांनी कोणी हडपल्या आहेत, त्या चव्हाट्यावर येतील, असं ते म्हणाले.

‘भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपली आहे. देवाच्या नावावर दिलेल्या जमिनी ज्यांनी लुटल्या आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाकायला हवं. आम्ही कारवाई सुरू केलीच आहे, पण सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आम्हाला त्यात मदत करावी, अशी अपेक्षा आहे. मंदिराची जमीन माजी मंत्र्यानं कशी हडपली? कसे शेकडो कोटी रुपये खाल्ले? याचाही भांडाफोड लवकरच करणार, असा इशारा त्यांनी दिला.

‘एका अधिकाऱ्याला वाटतं त्याच्या कर्ताकरवित्यांच्या मार्फत मला घाबरवता येईल आणि गप्प बसवता येईल. पण तसं होणार नाही. नवाब मलिक कोणाला घाबरणार नाही. चोरांच्या विरोधात ही लढाई आम्ही सुरू केली आहे, ती शेवटापर्यंत घेऊन जाणार. चोरांनी मला ललकारलं आहे, त्याला सडेतोड उत्तर मिळणार,’ असंही मलिक यांनी ठणकावलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here