राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे खोचक ट्विट

0

ठाणे,दि.१७: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खोचक ट्विट केले आहे. महाविकास आघाडी आज महामोर्चा काढणार आहे. तर भाजपा ‘माफी मांगो आंदोलन’ करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत काढला जाणार असून त्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले असून या मोर्चातून सरकारचा निषेध केला जाणार आहे. त्यात भाजपाकडूनही मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे.

असा असणार महामोर्चाचा मार्ग

मुंबईत भायखळा ते आझाद मैदान (क्रुडास कंपनी ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत) असा महामोर्चाचा मार्ग असणार आहे. शिवाय, टाईम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ सभादेखील होणार असून त्यावेळी महाविकास आघाडीतील नेतेमंडळी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर आक्रमक टीका करण्याची शक्यता आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून पाठवून द्यावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे शहरातील राजकीय वातावरण आत्तापासूनच तापू लागलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे खोचक ट्विट

दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात असताना दुसरीकडे भाजपाकडूनही आंदोलन केलं जात आहे. ठाणे-डोंबिवलीत विरोधकांना विरोध करण्यासाठी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावणारं ट्वीट केलं आहे. “हसावे का रडावे कळत नाही … ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात, त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो आणि बळाचा वापर करुन दुकानं, रिक्षा, बस बंद करत आहे. पोलीस मात्र हातावर हात ठेऊन बसले आहेत”, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे. राज्यभरातून या महामोर्चासाठी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here