राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे मोठे वक्तव्य, ‘भाजपला ही निवडणूक सोपी नाही’

0

मुंबई,दि.29: राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची प्रचंड लाट आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाला सोपी नाही, त्यांना 400 पार करणे अशक्यच वाटतेय, असे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

छगन भुजबळ यांनी या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या संभाव्य कामगिरीबद्दल बोलताना, 2014 आणि 2019 मधील निवडणूक जितकी एनडीएला सोपी गेली तशी यावेळची निवडणूक नसेल, असे ते म्हणाले.

शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होत असलेल्या लढतीबद्दलही भुजबळ यांना यावेळी विचारले गेले, त्यावर बारामतीमध्ये जे घडतेय ते दुःखदायक असल्याचे ते म्हणाले. इतकी वर्षे एकाच घरात ते राहत आहेत. त्यामुळे जे घडतेय ते अनेकांना आवडलेले नाही. यात दोष कुणाचा हा वेगळा मुद्दा असला तरी हे घडले नसते तर खूप चांगले झाले असते असे ते म्हणाले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा निवडणुकीत काय परिणाम होईल या प्रश्नाला उत्तर देताना मागील दोन निवडणुकांत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षांनी जशी कामगिरी केली तशीच कामगिरी यावेळीही ते पक्ष करतील, असे भुजबळ म्हणाले.

घोषणेमुळे भाजप अडचणीत

‘अब की बार, 400 पार’ या घोषणेमुळेही भाजप अडचणीत आला असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. भाजपची ही घोषणा संविधान बदलण्यासाठीच आहे असा जोरदार प्रचार विरोधी पक्षाने केला आहे. त्यातच भाजपचेच कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधान बदलणार असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे खरोखरच भाजपला संविधान बदलायचे आहे अशी भावना मतदारांमध्ये निर्माण झाली असल्याचे भुजबळ म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आता संविधान बदलू शकत नाहीत असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी जनतेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा परिणाम आता मतपेट्या उघडल्यानंतरच दिसून येईल असे भुजबळ म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here