राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे यांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश

0

ठाणे,दि.14: राष्ट्रवादीच्या जिल्हाप्रमुखाने एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाला मोठा फटका बसला. शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व बाळासाहेबांची शिवसेना असे नाव ठाकरे व शिंदे गटाला मिळाले. शिंदे गटात मागच्या तीन महिन्यांपासून इनकमींग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत युतीसरकारला पाठींबा दिल्याचे सांगितले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काल भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबत नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले. म्हात्रे यांनी युती सरकारला पाठींबा देताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटात शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेतेही सामील होत असल्याने आता राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.

याप्रसंगी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत तसेच मुरबाड-शहापूर तालुक्यातील सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबईतील उलवे परिसरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. उरण मतदार संघाचे कार्यकर्ते काल (दि.13) दुपारी उध्दव ठाकरेंना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पाठींबा असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांना काल रात्री अचानक बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला. उलवे शहर प्रमुख, शाखा प्रमुख, महिला शहर प्रमुख, महिला शाखा प्रमुख यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here