एनसीबीचे समीर वानखेडेनीं नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर दिले हे उत्तर

0

मुंबई,दि.२: समीर वानखेडे हे वसुलीसाठी एनसीबीचा वापर करत असून भाजपच्या काही लोकांची त्यांना साथ आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहेत की, त्यांचा पेहराव आणि राहणीमान जर पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून (PM Narendra Modi) पुढे गेल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. नवाब मलिक म्हणाले, तुम्ही समीर वानखेडेंचे सर्व फोटोज पाहा. शूज पाहा. दोन-दोन लाखांचे शूज वापरतात, शर्ट ज्याची किंमत 50 हजारांहून अधिक आहे असे शर्ट वापरतात. टी शर्ट तुम्ही पाहिले तर ज्याची किंमत 30 हजारांपासून सुरू होते. दररोज घड्याळ बदलतात मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ आहेत. 20 लाखांपासून 1 कोटी रुपयांचे घड्याळ आहेत.

एनसीबीचे समीर वानखेडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना नवाब मलिकांच्या आरोपांवर उत्तर दिलं. समीर वानखेडे रोज नवनवे कपडे वापरतात. ते ज्या ब्रँडची शर्ट वापरतात, ते महागडे असतात, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर बोलताना समीर वानखेडेंनी हा दावा फेटाळून लावला आहे. ‘माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर ही फक्त एक अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी याविषयी खरी माहिती शोधून काढायला हवी,’ असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

तसंच, समीर वानखेडे यांच्या बहिणीवर देखील नवाब मलिकांनी आरोप केले होते. त्यावरही वानखेडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सलमान नावाच्या एका ड्रग्ज पेडलरनं माझ्या बहिणीची भेट घेतली होती. पण ती एनडीपीएसच्या केसेस हाताळत नसल्यामुळं तिने त्याला परत पाठवलं. त्यानंतर सलमानने आम्हाला एक मध्यस्थीकरवी जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्याला नंतर अटक झाली असून तो सध्या तुरुंगात आहे. त्याचं व्हॉट्सॲप चॅट करुन चुकीचे आरोप केले जात आहेत,’ असं वानखेडेंनी स्पष्ट केलं आहे.

‘ज्यानं आम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता त्या मध्यस्थानं मुंबई पोलिसांत यावर्षी एक खोटी तक्रार दाखल केली होती. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर सलमानसारख्या पेडलर्सचा वापर करुन माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा देखील प्रयत्न झाला. असे प्रयत्न अजूनही होत आहेत. या सगळ्यामागे ड्रग्ज माफिया आहेत,’ असा आरोप समीर वानखेडेंनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here