मुंबई,दि.24: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप गोसावीच्या बॉडीगार्डने केला आहे. आर्यन खान अटक प्रकरणी (Aryan Khan) पंच किरण गोसावी याने शाहरुख खानकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीने हे आरोप फेटाळून लावले आहे तर दुसरीकडे समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईलने केला आहे.
गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. या आरोपानंतर आता खुद्द समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
‘माझ्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत आहे. माझ्यावर गुप्त हेतू ठेवण्यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी समीर वानखेडे यांनी पत्राद्वारे पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे.
तसंच, मला ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरीष्ठाकडे आहे.
मला तुरुंगात टाकण्याच्या आणि सर्विसमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या.. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी विनंतीच वानखेडेंनी केली आहे.
दरम्यान, एनसीबीने एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावर खुलासा केला आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे. तसंच, प्रभाकर साईल याने केले सर्व आरोप हे समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहे, असंही या पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे.