राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा केला गंभीर आरोप

0

नवाब मलिक एनसीबी महासंचालकांकडे करणार तक्रार

गोंदिया,दि.३१: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी धर्म बदलून नोकरी मिळविल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. क्रूझ ड्रग पार्टीवर केलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडे यांच्यावर आणखी एक गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे यांनी प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती, हे मी भविष्यात सिध्द करणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे.

नवाब मलिक गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी बोलताना त्यांनी अनेक गंभीर गोष्टींचा दावा केला. क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेले होते. या जेवणातूनच पार्टीमध्ये ड्रग्ज नेले गेले होते. याचे सगळे पुरावे माझ्याकडे असून मी ते उघड करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. एनसीबीच्या दिल्लीतील महासंचालकांकडे मी माझ्याकडे असलेले सर्व पुरावे पाठवणार असल्याचेही ते म्हणाले.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करताना ते म्हणाले की, छापेमारीत त्यांनी जप्त केलेले ड्रग्जचे फोटो हे त्यांच्या कार्यालयातीलच आहेत. हे लोक स्पॉटवर जाऊन मुद्देमाल जप्त करत नाहीत. ड्रग्ज कार्यालयात आणून हे सर्व केले जात आहे. एका कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. त्यानंतर बॅगेत भरून ड्रग्ज आणले जातात आणि आम्ही हे पकडले असे दाखवले जाते. यासाठी समीर वानखेडे यांनी एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत. हा सगळा फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसे अडकवले गेले ते सांगितले. त्यावेळी प्लेचर पटेल उपस्थित होता हे तिने सांगितले असे मलिक म्हणाले. त्यामुळे पुढे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here