मुंबई,दि.२१: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं विधान केलं आहे. शिवसेनेने भाजपा विरूध्द आघाडी उघडली आहे. शिवसेना आक्रमकपणे भाजपाला विरोध करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. राव आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबतच्या भेटीवर महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. यापूर्वी महाराष्ट्रात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्या होत्या. त्यांनीही मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. आता चंद्रशेखर राव देखील आले. देशात भाजपला पर्याय करण्याची तयारी सुरू झालेली आहे, असा दावा मलिक यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वारंवार सांगितले आहे की, देशात भाजपच्या विरोधात एक महाआघाडी व्हावी, ज्यात काँग्रेस पक्षाचा देखील समावेश असावा. कारण २०२४मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी नागरिकांच्या समोर भाजपला एक मोठा पर्याय उभा असेल, असे मलिक यांनी यावेळी सांगितले. मलिक यांनी सांगितले की, आता त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे असे मला वाटते. निवडणुकांपूर्वीच तिसरी आघाडी होईल आणि भाजपला पुढच्या निवडणुकीत सत्तेपासून दूर करेल, असा दावाही मलिक यांनी यावेळी केला.
आघाडीत काँग्रेसला घ्यायला हवेच, असं म्हणणारा पहिला पक्ष शिवसेना
काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी तयार होईल, असे कधीही बोललो नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केला. ममता बॅनर्जी यांनी याबाबत भाष्य केले होते आणि त्यावेळी या आघाडीत काँग्रेसला घ्यायला हवेच, असं म्हणणारा पहिला पक्ष शिवसेना होता, असेही राऊत यांनी सांगितले. रविवारी तेलंगणचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजपविरोधात एक नवीन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा या भेटीनंतर सुरू झाली आहे. त्याच मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका मांडली होती. काँग्रेसशिवाय देशात भाजपविरोधात कोणतीही आघाडी होणे शक्य नाही, असे त्यांनी म्हटले होते.