मुंबई,दि.14: Nawab Malik: काँग्रेस (Congress) पक्षाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेत काँग्रेस पक्षाची बदनामी होईल असे वक्तव्य केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी संसदेत काँग्रेसने कोरोना पसरवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोदींच्या या वक्तव्याचा विरोध करत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा घाट घातला. मात्र आंदोलन फडणवीसांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर काही काळ बाचाबाची झाल्यानंतर, हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर काँग्रेसकडून माघार घेण्यात आली.
मात्र याच आंदोलनावरून पुन्हा महाविकास आघाडीतील मतभेद बाहेर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे राष्ट्रवादीचा (NCP) काँग्रेसला थेट विरोध आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नेत्यांच्या घराबाहेर आणि पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू नये ही आमच्या पक्षाचीच भूमिका आहे, असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले आहे.
राष्ट्रवादीची आंदोलनाबाबत भूमिका काय?
या आंदोलनावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भूमिकेत भिन्नता दिसून आली आहे. कोणत्याही नेत्याच्या घरावर आंदोलन करण्याची भूमिका योग्य नाही. कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेब आंदोलन करु नये. यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होते. त्यामुळे हा नवा पायंडा योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने हे करू नये. यामुळे प्रशासनावर, पोलिसांवर ताण येतो. त्यामुळे सर्व पक्षांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे. आंदोलन करायला जागा ठरवून दिली आहे. तिथे आंदोलन केले पाहिजे, असे परखड मत नवाब मलिक यांनी मांडले आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.