मुंबई,दि.1: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली होती.
नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत. त्याबाबतचे पुरावे मी तुमच्यासमोर सादर करणारच आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही मी पुरावे देणार आहे. नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बाँम्बच फोडणार आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी कोणाच्याही मांडवलीची गरज लागत नाही. उद्धव ठाकरे आणि मी मांडवली नव्हे तर चर्चा करायचो. नवाब मलिक यांच्यासारखे लोक मांडवली करतात, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रत्युत्तर दिले.
रिव्हर मार्चच्या 4 वर्षांच्या मोहिमेदरम्यान शूटींगवेळी हे फोटो काढले आहेत. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला, असल्याचं फडणवीस म्हणालेत. रिव्हर मार्चकडून या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकले त्यामुळे त्याची पूर्ण पार्टी ड्रग्ज माफिया म्हणायची का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.