मुंबई,दि.7: Navneet Rana News: नवनीत राणा प्रकरणात पोलीस मॅनेज झाले का म्हणत न्यायालयाने फटकारले आहे. बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र (Bogus Caste Verification Certificate) प्रकरणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने मुंबईतील शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने (Sewri Court) नाराजी व्यक्त केली आहे. बोगस जात पडताळणी प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी ‘कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? पोलीस मॅनेज झाले का?’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापून काढलं.
खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांना खडेबोल सुनावले.
नवनीत राणा यांच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड पोलीस (Mulund Police) ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला. यावर नाराजी व्यक्त करत शिवडी कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. ‘न्यायालयाच्या आदेशांचं पालन होताना इथे दिसत नाही’ असं म्हणत कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असे प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारले. आता नवनीत राणा यांच्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
नवनीत राणा यांच्यावर आरोप काय?
जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने (Sewri Court) या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना (Mulund Police) कारवाईचे आदेश जारी केले आहेत. नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्यानं शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आणखी वेळ मागितल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.