Narayan Rane: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी पाठवली नोटीस

0

सिंधुदुर्ग,दि.२९: Narayan Rane: कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस (Police sent notice to Narayan Rane) पाठवली आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात राणे कुटुंबीयांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याप्रकरणीच पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे (Nitesh Rane) हे नॉट रिचेबल आहेत. त्यांचा ठावठिकाणा नारायण राणे यांना माहिती असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात बोलावले आहे. यावर आता नारायण राणे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. नारायण राणे यांनी या नोटीसबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पोलिसांनी नोटीसमध्ये काय म्हटले?

नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावरील गुन्ह्याबाबत आपण काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. शिवाय पत्रकार परिषदेत नितेश राणे यांच्या ठाव-ठिकाणाबद्दल प्रश्न विचाला असता नितेश राणे कोठे आहेत ते सांगायला आम्ही मुर्ख आहोत का? असे वक्तव्य केले. हे वक्तव्य आज वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे नितेश राणे यांचा ठाव-ठिकाणा आपणास पूर्णपणे माहित आहे. त्यामुळे पोलिसांची नोटीस मिळताच नितेश राणे यांना पोलिसांमोर हजर करावे, तसेच पत्रकार परिषदेतील वक्तव्यानुसार आपल्याला माहिती असलेल्या गुन्ह्याच्या तपशीलाबाबत जबाब नोंदवण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर राहावे असे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

दुसरीकडे सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी सुरु असतानाच पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अत्यंत नियोजनपूर्वक पावले टाकताना दिसत आहेत. काहीवेळापूर्वीच नितेश राणे यांचे स्वीय सहायक राकेश परब आणि वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी यांनाही पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत.

नारायण राणे यांनी मंगळवारी कणकवलीमध्ये पत्रकारपरिषद घेतली होती. त्यावेळी त्यांना नितेश राणे कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा नारायण राणे काहीसे संतापले होते. कुठल्या चॅनलचे पत्रकार आणि असे प्रश्न कसे काय विचारता असा जाब त्यांनी विचारला. तसेच नितेश राणे कुठे आहे हे सांगायला काय मी मूर्ख नाही. मला नितेश राणे कुठे आहेत, हे माहिती असते तरी मी सांगितले नसते. मी तुम्हाला ही माहिती का सांगावी, असा प्रतिप्रश्न नारायण राणे यांनी केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here