दि.31: सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपानं बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी (नारायण राणे) राज्य सरकार आणि अजित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
“आम्ही अक्कल वापरुच निवडणूक जिंकली. जनतेनं पण अक्कल वापरुनच मतदान केलं आणि अक्कल असणाऱ्यांनाच सत्ता दिली. तर अक्कल नसलेल्यांचा पराभव झाला”, असाही खोचक वार नारायण राणे यांनी अजित पवारांचं नाव न घेता केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक भाजपा विरूद्ध तीन पक्ष अशी रंगवण्यात आली होती, पण मी राजकारणात साऱ्यांना पुरून उरलो आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. या वेळी नितेश राणे यांच्याबाबतीत शिवसेनेने केलेल्या पोस्टरबाजीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
जिल्हा बँकेसंदर्भातील निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्याचं प्रकरण घडलं. या हल्ल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांच्यावरील आरोपादरम्यान ते ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी ‘नितेश राणे हरवले आहेत, त्यांना शोधून दाखवा’, अशा आशयाची पोस्टरबाजी केली होती. या संदर्भात नारायण राणेंचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणेंनी खोचक शब्दात उत्तर दिले.
“पोलीस यंत्रणा असताना यांनी पोस्टरबाजी केली. एखाद्याला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा असते. पण हे केवळ पोस्टर लावण्याच्या पात्रतेचेच आहेत. राज्यकारभार सांभाळण्याची यांची पात्रता नाही. ना राज्याचा ना बँकेचा.. कोणताही कारभार सांभाळण्याची यां लोकांची पात्रता दिसत नाही. त्यामुळे या लोकांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घ्या आणि महाराष्ट्रभर पोस्टर लावत फिरा”, असा टोला नारायण राणेंनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना लगावला.