नाना पटोले यांचे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत शाहू छत्रपती यांचे नाव घेत मोठं विधानं

0

मुंबई,दि.२९: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाबत शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) यांचे नाव घेत मोठं विधानं केलं आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या वक्तव्याचा फटका पश्चिम महाराष्ट्रात कोणाला बसेल हे सांगायची गरज नाही, असे राष्ट्रवादीचे नाव न घेता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काय संबंध आहे मला माहित नाही, असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

“श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे वक्तव्य स्पष्ट असून त्यांनी भाजपाकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा तोटा किंवा फायदा कोणाला होणार हे भविष्यात स्पष्ट होईलच. भाजपाचे नुकसान व्हायला लागले म्हणून फडणवीस श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या वक्तव्यावर टीका करीत आहेत,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“संभाजी महाराजांच्या कोंडीसाठी त्यांचे वडील भाजपकडे बोट दाखवत आहेत. फडणवीस पवारांचे नाव घेत आहेत तर पवार फडणवीस यांचे नाव घेत आहेत. शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काय संबंध आहे मला माहीत नाही,” असेही पटोले म्हणाले. “भाजपकडून समाज माध्यमाद्वारे देशातील वास्तविक स्थिती लपवली जात आहे. वास्तवात श्रीलंकेत जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती भारतातही निर्माण झाली आहे,” असेही पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस

“शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असं वाटतं की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतं आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते आणि सध्या ही होत आहे. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचा कुठलाही नुकसान भाजपाला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून संभाजीराजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते,” असेही फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here