काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.11: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं असा दावा काँग्रेसनं केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची शिफारस केली. त्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवेंच्या नियुक्तीची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. 

याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. परंतु 2019 च्या निकालानंतर लोकशाहीचा तमाशा भाजपानं केला. विपरीत परिस्थितीत आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. जनतेच्या हितासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी तो निर्णय घेतला होता. विरोधी पक्षात काम करण्याची आमची मानसिकता होती असं त्यांनी सांगितले.

तसेच महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची ही भूमिका काँग्रेसची नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. महाविकास आघाडी म्हणून यावर चर्चा व्हायला हवी होती. चर्चा न करता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडला गेला त्याला आमचा विरोध आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस राहणार की बाहेर पडणार याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here