मुंबई,दि.५: काँग्रेसचे २२ आमदार फुटणार असल्याच्या दाव्यावर नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेवर (ठाकरे गट) पलटवार केला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकार कोसळेल म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचा मोठा दावा केला होता. या दाव्यानंतर खळबळ उडाली. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून, अंतर्गत धुसपूस वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे गटातील नेत्याच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार केला आहे. ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करु नये, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाण्याबाबत विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सध्या शांत आहेत, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. यानंतर नाना पटोले यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना दुसऱ्यांच्या पक्षाबाबत बोलायचे काही कारण नाही. सत्तेत असून आपला पक्ष ज्यांना नीट सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षात पाहावे, या शब्दांत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, तोडोवाल्यांचा जोडोशी काय संबंध? त्यांच्याबद्दल फारसे बोलणे योग्य नाही. भारत जोडो यात्रेचा परिणाम उलटा पाहायला मिळत असल्याची टीका भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. यावर बोलताना, राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे नाना पटोले म्हणाले.