किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, सरकारी वकिलांचं मोठं विधान

0

मुंबई,दि.११: भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. किरीट सोमय्या यांनी कोर्टात चोरी मान्य केली आहे, असं मोठं विधान वकील घरत यांनी केलं. तसेच चोरी एक पैशांची असो की कोट्यावधींची, ती चोरीच असते. त्यामुळे सोमय्यांवर कारवाई होईल, असंही त्यांनी नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, “किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात सकाळी युक्तीवाद झाला. सोमय्या यांनी त्यांच्या जामीन अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली होती तीच आम्ही विशेष करून दाखवली. कारण त्यांनी त्या कागदपत्रांमधून तो गुन्हा जवळजवळ कबुलच केला होता. तसेच फोटोग्राफ देखील लावले होते. त्यामुळे आमचा युक्तीवाद तोच झाला. मला नुकतंच सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचं समजलं. निकाल हातात आल्यावर त्यावर अधिक बोलेल.”

चोरी ती चोरी

“एका पैशाची केली तरी ती चोरीच आणि कोट्यावधी रुपयांची केली तरी ती चोरीच. त्यामुळे चोरी ही चोरीच असते. ही चोरी किरीट सोमय्या यांनी मान्य केली. आता त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल,” असंही प्रदीप घरत यांनी नमूद केलं.

कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्या यांच्या वकील पावनी चड्डा यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज होता. पूर्ण २ तास सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. आता आम्ही यावर उच्च न्यायालयात आव्हान देऊ.”

“न्यायाधीशांचं म्हणणं असं आहे की गोळा केलेले ११ हजार रुपये संबंधितांकडे जमा झालेले नाहीत. ते पैसे दिल्याचे सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात यावर स्पष्टीकरण देऊ. आम्ही काही दिलासा देण्याची विनंती केली होती मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळली आहे. आज किरीट सोमय्या यांच्या प्रकरणी निकाल देण्यात आला, उद्या नील सोमय्या यांच्या प्रकरणी निकाल येईल,” असंही पावनी चड्डा यांनी नमूद केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here