मुंबई,दि.26: क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी NCB चे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान अटक प्रकरणी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत घडामोडींना वेग आला आहे. पंच प्रभाकर साईलला (Prabhakar Sail ) पोलीस संरक्षण दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांची भेट घेतली. यावेळी, गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. पंच प्रभाकर साहिल प्रकरणी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर साईलने केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. त्याने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलीये अशी विचारणा खुद्द गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी NCB वर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि पंच केपी गोसावी यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. प्रभाकर साईल हा स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली होती. त्यानंतर ही डील 18 कोटींवर झाली. यातील 8 कोटी हे एनसीबीच्या अधिकाऱ्याला द्यायचे असं ठरलं होतं.
त्याच्या आरोपानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी साईलचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून कोर्टात धाव घेतली पण तिथेही याचिका फेटाळून लावली.
याच दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी जर प्रभाकर साईलने गुन्हा दाखल केला तर पोलिसांना कारवाई करावी लागेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त वळसे पाटलांना भेटायला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.