मुंबई,दि.२६: Mumbai: क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे. मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यावरुन निर्माण झालेला वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. याठिकाणी भाजप, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले. सध्या याठिकाणी भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेस्टच्या बसेसची हवा काढली आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यानंतर पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, तरीही याठिकाणी अजून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात सध्या तणाव निर्माण झाला आहे.
काहीवेळापूर्वीच भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालाडमधील क्रीडा संकुलाच्या बाहेर येत घोषणबाजीला सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्यांना हुसकावून लावल्यानंतर आंदोलकांनी जवळच असणाऱ्या महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने या क्रीडा संकुलाचे काम करण्यात आले होते. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात आल्याचे फलक या परिसरात लागले होते. त्यावरुन कालपासून मालाडमधील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मात्र, अस्लम शेख यांनी क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले. क्रीडा संकुलाच्या विकासाकडे लक्ष न देता भाजपवाले नावावरुन राजकारण करत आहेत.
गेल्या ७० वर्षांमध्ये देशात कधीही शेर-ए-मैसूर टिपू सुलतानाच्या नावाला कधीही विरोध झाला नाही. यापू्र्वी भाजपच्याच नेत्यांनी मुंबईत रस्त्याला टिपू सुलतानाचे नाव दिले आहे. मग आत्ताच भाजप टिपू सुलतानाच्या नावाला का विरोध करत आहे, असा सवाल अस्लम शेख यांनी विचारला. थोड्याचवेळात अस्लम शेखही मालाडमधील या क्रीडा संकुलाच्या परिसरात दाखल होणार आहे. तेव्हा हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या आंदोलनात सहभागी झालेले खासदार गोपाळ शेट्टी आणि अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. हे मैदान मुळात अनधिकृत आहे. ही जागा मैदानासाठी आरक्षित नव्हती. त्यामुळे हे क्रीडा संकुल अनधिकृत असल्याचा दावा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केला.