सोलापूर,दि.16: मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन (Mumbai Ahmedabad bullet train) मार्गाच्या पूर्णत्वासाठी केंद्राकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेननंतर मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Hyderabad Bullet Train) ही दुसरी बुलेट ट्रेन मंजूर झाली असून ती यापूर्वी सोलापूरमार्गे हैद्राबादला जाणार होती. मात्र आता ती माळशिरस, अकलूज, पंढरपूरवरून सोलापूर मार्गे हैद्राबादला पोहचणार आहे. या नवीन मार्गास पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांनी दिली. (Mumbai-Hyderabad Bullet Train News)
बुलेट ट्रेनचा नियोजित मार्ग सोलापूरहून | Mumbai-Hyderabad Bullet Train
मुंबई-अहमदाबाद नंतर मुंबई-हैद्राबाद ही दुसरी बुलेट ट्रेन यापूर्वीच मंजूर झाली आहे. मात्र तिचा नियोजित मार्ग हा सोलापूरवरूनच जाणार होता. भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पांडुरंगाच्या पंढरीतील वारकऱ्यांनाही या बुलेट ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी ही बुलेट ट्रेन माढा लोकसभा मतदारसंघातून जावी, अशी मागणी यापूर्वीच माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.
त्याला आता रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून लवकरच तांत्रिक मान्यतेचा आदेशही काढला जाणार आहे, अशी माहिती खा. नाईक-निंबाळकर यांनी दिली.
कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा | Mumbai-Hyderabad Bullet Train News
मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प एनएचआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनला सादर करण्यात आला. त्याचा पीएफआर रिपोर्ट व डीपीआर रिपोर्ट झाला आहे. टेक्निकल सर्व्हेसुध्दा चालक विरहित विमानातून झाला आहे. रेल्वे मंडळाला सादर केलेल्या डीपीआरला लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत तांत्रिक मंजुरी मिळेल, असा विश्वास खा. नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन | ताशी 350 कि.मी. वेग
या मार्गावर प्रति तास 350 किलोमीटरच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे, तसा त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे, हा वेग सरासरी 250 कि.मी. प्रति तास असेल. रूळ स्टैंडर्ड गेजचे असतील. एका ट्रेनची प्रवासी क्षमता 750 असणार आहे. आत्ता मुंबई- हैद्राबाद प्रवास करण्यासाठी 14 तास लागतात. हा प्रवास बुलेट ट्रेनमुळे अवघ्या तीन तासांत पूर्ण होणार आहे.