मुंबई,दि.१३: बिनविरोध निवडणूक प्रकरणी तातडीने उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील २९ महापालिका करिता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र राज्यातील अनेक महापालिकेत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ७० पेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav MNS) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात उद्या (दि.१४) बिनविरोध निवडणूक संदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. राज्यातील अनेक महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, यात सर्वाधिक भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
सर्वाधिक बिनविरोध झालेले उमेदवार भाजपाचे आणि त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे आहेत. निवडणुकीतील या बिनविरोध पॅटर्नविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी कोर्टात धाव घेतली होती. उमेदवारांना पैशाची आमिषे, दहशत याचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला असा मनसेचा आरोप आहे.

राज्यात याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका कधीच झाल्या नाहीत. स्थानिक पातळीवर जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात तिथे अनेक चर्चा होत आहेत. ३- ६ कोटीपर्यंत विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले. ही लोकशाहीची भयानकता आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने आम्ही कोर्टात याचिका केली. त्यात ३ मुख्य मुद्दे आहेत.
राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत. ६८ ते ७० ठिकाणी भाजपा, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून आलेत. याबद्दल लोकांमध्ये शंका आहे. प्रथमदर्शनी ही चोरीची घटना म्हणून निदर्शनास येते. दुसरे नोटाचे जे मतदार आहेत त्यांना एक उमेदवार असला तरी मतदान करू दिले पाहिजे. किमान मतदान टक्का हा बिनविरोध निवडणुकांसाठी काय असेल याबद्दल कायद्यात तरतूद नसेल तर राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करावी अशी मागणी याचिकेत केल्याचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.








