मुंबई,दि.28: मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. क्रूझ ड्रग पार्टीवर कारवाई केल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक आरोप करत आहेत. ड्रग पार्टीवर करण्यात आलेली कारवाईच बोगस असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. प्रभाकर साईलने क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानला सोडविण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एसआयटी मार्फत तपास सुरू केला आहे. क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेतून अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी केली. यानंतर न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला वानखेडे यांच्यावर सध्या कोणतेही कठोर पाऊल उचलू नये, अटकेच्या 3 दिवस आधी नोटीस द्यावी, असे सांगितले.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी तपासाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तपास सुरू असताना समांतर तपासाची काय गरज आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा अन्य केंद्रीय एजन्सीकडे सोपवावा, असे ते म्हणाले. समीर वानखेडे यांच्या याचिकेला राज्य सरकारने विरोध केला.
ते म्हणाले की, वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी प्राप्त झाल्या असून मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले की तपास अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे, सध्या मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवलेला नाही.