मुंबई हायकोर्टाने राणा दांपत्याला सुनावलं; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

0

मुंबई,दि.२५: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानात हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेसह दोन समुदायांत तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केल्याने राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा (Navneet Rana And Ravi Rana) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या राणा दांपत्याला मुंबई हायकोर्टाने धक्का दिला आहे. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे.

एकाच दिवशी दोन घटना घडल्यानं दोन एफआयआरची गरज काय, असा प्रश्न राणा दाम्पत्याकडून उपस्थित करण्यात आला होता. आमच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआर एकत्र करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्याच आली. मात्र ती मागणी न्यायालयानं फेटाळून लावली.

राणा दाम्पत्याचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी तातडीचा विषय असल्याचे सांगत सुनावणी घेण्याची विनंती केल्यानंतर न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दुपारी सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. यावेळी याचिका फेटाळत असताना कोर्टाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात किंवा निवासस्थानाबाहेर म्हणजेच रस्त्यावर हनुमान चालिसा म्हणू, अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लंघन करणारी आहे, असं मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. हायकोर्टाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने राणा पती-पत्नीचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. घटनेनं तुम्हाला काही विशेषाधिकार दिले आहेत. अधिकारांसोबत जबाबदाऱ्या येतात. तुम्ही पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित होतं. तुम्हाला जर जबाबदाऱ्यांचा विसर पडला असेल तर मग तुमच्याविरोधात कारवाई गरजेची आहे, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्याला सुनावलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here