दि.10: Mulayam Singh Yadav Demise : समाजवादी पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.
3 वर्षापासून मुलायम सिंह यादव यांची तब्येत खराब होती. महिन्यातून 2-3 वेळा ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. परंतु ऑगस्ट महिन्यापासून मुलायम यांची तब्येत खालावत चालली होती. 22 ऑगस्टपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 2 ऑक्टोबरला दुपारी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, आयसीयूमध्ये हलवण्यात आले.
त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाला होता. मुलायम सिंह यादव यांना श्वसनाचा-रक्तदाबाचा त्रास होता. डॉ. नरेश त्रेहान आणि डॉ. सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे.
मुलायम सिंह यादव यांचा परिचय
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील सैफई गावात मूर्ति देवी आणि सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात झाला. मुलायम सिंह हे रतन सिंह यांच्यापेक्षा लहान आहेत आणि त्यांच्या पाच भावंडांपैकी अभयराम सिंह, शिवपाल सिंह यादव, राम गोपाल सिंह यादव आणि कमला देवी यांच्यापेक्षा ते मोठे आहेत. ते ‘धरतीपुत्र’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. गेल्या काही वर्षांत देशात जेव्हा जेव्हा तिसऱ्या आघाडीची चर्चा होते तेव्हा मुलायमसिंह यादव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रानेही राजकीय दरवाजे उघडले.