मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, उत्तर प्रदेशात कलम 144 लागू

0

लखनऊ,दि.29: गुंड-म्होरक्या मुख्तार अन्सारीचा गुरुवारी बांदा येथे मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बांदा तुरुंगात मुख्तार यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना बांदा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. आज मुख्तारच्या मृतदेहाचे कुटुंबीयांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. वडिलांच्या हत्येचा आरोप करत मुलगा उमरने न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारी यांना अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्तार अन्सारी यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. जिथे त्यांना 9 डॉक्टरांच्या पथकाने वैद्यकीय उपचार दिले. मात्र उपचारादरम्यान मुख्तार अन्सारी यांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशात कलम 144 लागू

संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच बांदा, मऊ, गाझीपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती. प्रयागराज, फिरोजाबादसह अनेक शहरांमध्ये पोलिसांनी फ्लॅग मार्चही काढला. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बांदा मेडिकल कॉलेज परिसराभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात

मुख्तार अन्सारी यांनी गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात प्रवेश केला होता. 1996 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले. मुख्तार अन्सारी पाच वेळा मऊचे आमदार होते. तुरुंगात असताना त्यांनी अनेक निवडणुका लढल्या आणि जिंकल्या. मुख्तारवर खून, दरोडा, अपहरण असे 60 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत त्यांची 500 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here