मुंबई,दि.15: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना येत्या तीन तासात संपवून टाकू असा धमकीचा फोन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात आला आहे. महत्वाची बाब अशी की सकाळपासून तब्बल 8 वेळा असा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आता तातडीनं तपासाला सुरुवात केली असून नंबर ट्रेस केला जात आहे. तसंच मुंबई पोलिसांची एक टीम आता अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलिया परिसरातही पोहोचली आहे. अँटेलिया परिसरात पोलिसांकडून पाहणी केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयातील लँड लाइनवर आज सकाळपासून आठ वेळा धमकीचा फोन आला आहे. फोनवर मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारू अशी धमकी दिली गेली. रुग्णालय प्रशासनानं याची दखल घेत मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.