सोलापूर,दि. 5: पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सूरज राम जाधव या तरुणाने बुधवार (दि. 2 मार्च) रोजी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने उपचारा दरम्यान, शुक्रवारी (दि. 4) त्याचे निधन झाले. मात्र, आत्महत्येच्या दिवशी मगरवाडी गावातील शेतीचा वीजपुरवठा चालू असताना सदर प्रकरणाशी महावितरणचा संबंध जोडून वीजबिल वसुली मोहीमेला आठकाठी आणण्याचे राजकारण केले जात असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
मगरवाडी गावाला तारापूर (ता. पंढरपूर) येथील वीज उपकेंद्रातून 11 के.व्ही. मगरवाडी या शेतीवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. चक्राकार पद्धतीनुसार बुधवारी रात्री 9 ते पहाटे 5 या वेळेत हा वीजपुरवठा सुरु होता. दरम्यान, बुधवारीच गावातील सूरज राम जाधव या तरुणाने वीष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मयत सूरज याच्या नावाने किंवा त्याचे वडील राम नागनाथ जाधव यांच्या नावाने महावितरणचे कोणेतेही शेती कनेक्शन नाही. त्यांच्या कुंटुंबाकडे नागनाथ पंडित जाधव या नावाने जुने शेती कनेक्शन आहे. बहुधा ते मयत सूरज यांच्या आजोबाच्या नावाने असावे. तसेच या कनेक्शनचा वापर संयुक्तपणे केला जात आहे. त्या कनेक्शनचा ग्राहक क्रमांक 337180150786 असा असून, यावर 33 हजार 340 रुपये इतकी थकबाकी आहे.
दरम्यान, महावितरणची वीजबिल वसुली मोहीम जिल्ह्यात सर्वत्र सुरु आहे. थकबाकी वसुलीसाठी संबंधित गावात जाऊन, मेळावे घेऊन शेतकऱ्यांना वेळोवेळी वीजबिल भरण्याचे आवाहन केलेले आहे. त्यानंतरच वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे काम केले जाते. मगरवाडी येथील शेतकऱ्यांनाही वीजबिल भरण्याचे आवाहन वेळोवेळी केलेले आहे. मात्र, बुधवारी (दि.2) त्या गावातील कोणत्याही शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडित केलेला नव्हता. तसेच मयत तरुणाच्या नावाने कोणतीही वीज जोडणी नसताना काही समाजघटकांनी आत्महत्येला वीजबिल वसुली विरोधात ढाल म्हणून वापर केल्याचा दावा महावितरणने केला असून वीजबिल वसुलीची मोहीम नियमानुसार चालूच राहणार असल्याचेही कळविले आहे.