मुंबई,दि.१६: प्राप्तिकर विभागाच्या ( आयटी ) छापेमारीत काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे ३५० कोटींहून अधिक रक्कम आढळून आली होती. पाच दिवसांच्या मोजणीनंतर ही रक्कम प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. यानंतर धीरज साहू यांच्यासह काँग्रेसवर भाजपाकडून टीका करण्यात येत होती. अशातच या पैशांबद्दल धीरज साहू यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
‘एएनआय’शी संवाद साधताना धीरज साहू म्हणाले, “मी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे. रांची आणि ओडिशात विकासाची कामे केली आहेत. माझे वडिलही गरीबांची मदत करत असे. आम्ही अनेक शाळा कॉलेज आणि कॉलेजची स्थापना केली आहेत. जे होत आहे, त्यानं मला खूप दु:ख झालं आहे.”
मी राजकारणात सक्रीय असल्यानं…
“जो पैसा प्राप्तिकर विभागाने जप्त केला आहे, तो आमच्या व्यवसायातील आहे. १०० वर्षाहून अधिक काळापासून आमचा मद्य विक्रीचा व्यवसाय आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात महसूलही दिला आहे. मी राजकारणात सक्रीय असल्यानं कुटुंबीय व्यवसाय पाहत होते,” असं धीरज साहूंनी सांगितलं.
मद्य विक्री रोकडमध्ये होते
“प्राप्तिकर विभागाने जप्त केलेला पैसा मद्य व्यवसायातील आहे. कारण, मद्य विक्री रोकडमध्ये होत असते. या पैशाचा काँग्रेस अथवा अन्य पक्षाशी कुठलाही संबंध नाही. हा पैसा माझा नाहीतर माझ्या कुटुंबीयांचा आणि कंपन्यांचा आहे. मी सर्व हिशोब देण्यास तयार आहे,” असं धीरज साहू यांनी म्हटलं.
“काहीची देणी आणि महसूल देण्यासाठी पैसे ठेवण्यात आल्याचं कुटुंबीयांकडून मला सांगण्यात आलं. हे प्राप्तीकर विभाग आणि कुटुंबीयांमधील प्रकरण आहे. कुटुंबीय प्राप्तिकर विभागाकडे आपलं स्पष्टीकरण देतील,” असं धीरज साहू म्हणाले.