परभणी,दि.25: लिंगायत धर्माची संविधानिक मान्यतेसाठी व राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने या मागणीसाठी रविवार, दि.24 रोजी परभणी शहरातील प्रमुख मार्गावरून राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात आला महामोर्चात भारत देशा जय बसवेशा असा जयघोष करीत राज्यभरातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास शनिवार बाजार मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली तसेच लिंगायत धर्मगुरु प.पू. महिला जगद्गुरू गंगा माताजी, प.पू. जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामीजी व विविध ठिकाणावरून आलेले लिंगायत समाजातील धार्मिक गुरूंची रथातून मिरवणूक काढण्यात आली.देशभरातील समाज बांधव सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या ठिकाणी धर्मगुरूंनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठीची राज्य सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी, राज्यातील लिंगायत धर्मियांना, धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा जाहीर करावा, लिंगायत बेरोजगार युवकांच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथील मंजूर असलेल्या महात्मा बसवण्णांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे, लिंगायत आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, परभणी शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा शासनातर्फे उभा करावा. आदी मागण्यांसाठी लिंगायत महामोर्चा काढण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, परभणी शहराचे आमदार राहुल पाटील, राष्ट्रीय निमंत्रक अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक माधवराव टाकळीकर, राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे, लातूरचे जि. प.सदस्य महेश पाटील, प्रा. राजेश विभुते, बसवेश्वर हेंगणे, यवतमाळचे निलेश शेटे, वर्धा येथून कैलास वाघमारे, तेलंगणा राष्ट्रीय बसव दलचे राज्याध्यक्ष शंकर पटेल, नांदेडचे डॉ व्यंकट कुऱ्हाडे पिंटू बोंबले, औरंगाबादचे प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगिरी, सोलापूर सोलापूरचे सकलेश बाभुळगावकर भीमा बिराजदार आदी उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद अध्यक्ष अणेराव, दादा वाघीकर, किर्तीकुमार बुरांडे, प्रा.सोनटक्के, बबलू सातपुते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
 
            
