बाळासाहेब ठाकरेंसारखा मोठेपणा मोदी आणि शरद पवारांमध्ये नाही: प्रकाश आंबेडकर

0

अकोला,दि.७: बाळासाहेब ठाकरेंसारखा मोठेपणा मोदी आणि शरद पवारांमध्ये नाही अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झाली आहे. दारुड्या जसं एक-एक साहित्य विकतो तसाच देशाचा कारभार सुरु आहे. पंतप्रधानांना मी दारुडा म्हणत नाही.

पण त्यांची वागणूक दारुड्यासारखी आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अकोल्यात भारतीय बौद्ध महासभेनं घेतलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अकोला क्रिकेट क्लबवरील मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. पाऊस असतानाही लोकांनी सभेला चांगलीच गर्दी केली होती.

“बाळासाहेब ठाकरेंसारखा मोठेपणा मोदी आणि पवारांमध्ये नाही”

“दाडू इंदुरीकरांच ‘गाढवाचं लग्न’ हे नाटक बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिल्यानंतर त्यांचा मोठेपणा दिसून आला होता. राजकीय वैर न ठेवता मनाचा मोठेपणा जसा बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आणि शरद पवारांमध्ये नाही,” अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

देवेंद्र फडणवीसांचं डिमोशन झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर ते उद्या अकोल्यात येत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. तसंच ग्रामपंचायत निवडणुका वंचित लढणार आहे अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी या निवडणुका ताकदीने लढवायच्या. एकमेकांच्या उरावर बसायचं असेल तर खुशाल बसा. आरेला कारे करण्याची तयारी ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here