मुंबई,दि.२५: MNS Vs BJP: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपावर टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचं वाहन रोखल्यामुळे झालेल्या वादात मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्याची घटना चर्चेत आली आहे. अमित ठाकरे शिर्डीहून परत येत असताना सिन्नर तालुक्यातल्या टोलनाक्यावर त्यांचं वाहन अडवण्यात आलं. तिथे वाद झाला. त्यानंतर रात्री मनसे कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. यावरून महाराष्ट्र भाजपानं आपल्या ट्विटर हँडलवरून अमित ठाकरेंवर टीका केल्यानंतर त्याला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. (MNS Vs BJP)
काय आहे घटना? | MNS Vs BJP
अमित ठाकरे शिर्डीहून समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास या टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांनी त्याचं वाहन थांबवलं. सुमारे अर्धा तास हा प्रकार चालू होता. यावेळी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंशी अरेरावी केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेवेळी अमित ठाकरेंबरोबर इतर कुणी पदाधिकारी नव्हते. मात्र, नंतर रात्री १० च्या सुमारास मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
भाजपाने व्हिडिओ केला शेअर
दरम्यान, यावरून महाराष्ट्र भाजपानं राज ठाकरेंच्या टोलनाका आंदोलनाचा संदर्भ देत अमित ठाकरेंना लक्ष्य केलं. “अमित ठाकरे, टोल फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका व शिकवा” असं ट्वीट करत भाजपानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्यांची चूक नसताना मनसे कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफेड करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मनसेचं प्रत्युत्तर | MNS Vs BJP
दरम्यान, महाराष्ट्र भाजपाच्या ट्वीटनंतर मनसेकडून नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “टोल फोडण्याबद्दल आम्हाला बोलणारे.. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला बांधण्याबद्दल काय शिकवणार? त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वत:चा पक्ष बांधावा. एक टोल फुटला तर एवढी थोबाडं उघडणारे, मणिपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या तेव्हा महाराष्ट्र भाजपाचं थोबाड बंद का होतं? आता फक्त टोलनाक्याच्या कंत्राटदारांची दलाली करायची आहे का तुम्हाला? हेच भाजपा व शिवसेना जेव्हा २०१४ ला सत्तेत येणार होते तेव्हा यांनीच जाहीर केलं होतं ना महाराष्ट्रातले टोल बंद करणार? मग आता ते विसरले का?” असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे.
“कुणाची काय चालेल आणि काय नाही हे आम्हाला भाजपाकडून शिकायची गरज नाही. भाजपानं आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये. आम्हाला ती करताही येते आणि निभावताही येते”, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.