मुंबई,दि.३:मनसेने घाटकोपरमध्ये लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. राज ठाकरेंनी अनेक मुद्दे मांडले. राज ठाकरेंनी मदरशावर भाष्य केले.
जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का?
“प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले.
सभेत राज ठाकरेंनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. मनसे कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केली आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केली आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे महेंद्र भानुशाली यांना ताब्यात घेतले आहे.
मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयासमोर दोन लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. त्यावर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र लावण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. हे फक्त आजच्या दिवस वाजणार नाही रोज वाजविण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मशीदीवरील भोंगे हटवायचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन होत नाही. आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत आहोत. माझ्या धर्माचे पालन करण्याचा मला अधिकार आहे. त्यांना स्पिकरवरून अजाण म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांना विरोध नाही. पण, आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत असू तर त्यात गैर काय असा सवाल महेंद्र भानुशाली यांनी केला आहे.
घाटकोपर मनसेच्या वतीने आज विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी आपल्या कार्यलयावर महादेव मंदिर समोर झाडावर स्पीकर लावत हनुमान चालीसा लावली होती. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.